स्त्रिया

एक स्त्री आपल्या पर्समधून एक फुटकळ नोट काढून कंडक्टरकडून घरच्या परतीचे तिकीट मागत आहे
तिच्यावर अगदी आत्ताच ,काही वेळापूर्वी झाला आहे बलात्कार
त्याच बसमध्ये एक दुसरी स्त्री आपल्यासारख्याच लाचार
समवयस्क दोन-तीन स्त्रियांशी
पदोन्नती आणि महागाई भत्त्याविषयी बोलते आहे
कार्यालयातील तिच्या वरिष्ठांनी तिला आज पुन्हा मेमो दिला आहे
एक स्त्री जिने अखंड सौभाग्यवती राहण्यासाठी ठेवले आहे
करवा चौथचे निर्जल व्रत
ती पती वा सासूच्या हातून मारले जाण्याच्या भीतीने गाढ झोपेतूनच
किंचाळत उठते अचानक
एक स्त्री अर्ध्या रात्री बाल्कनीत उभी आहे बघत वाट
आपल्यासारख्याच असुरक्षित आणि असहाय कुण्या दुसऱ्या स्त्रीच्या घरून
परतणाऱ्या आपल्या दारुड्या नवऱ्याची
संशय-शंका , असुरक्षितता आणि भीतीने वेढलेली एक स्त्री मार खाण्याआधी
अतिशय दबल्या आवाजात विचारते आहे आपल्या नवऱ्याला की -
कुठे खर्च झाले तुमच्या पाकिटातल्या पगारातील अर्ध्यापेक्षा जास्त पैसे?
एक स्त्री आपल्या मुलाला आंघोळ घालताना रडू लागते उगीचच
हमसून हमसून
आणि मुके घेते त्याचे वेड्यासारखे पटापटा
आणि शोधू पाहतेय त्याच्या भविष्यात आपल्यासाठी एखादे शरणस्थळ
किंवा एखादी गुहा
एका स्त्रीचे हात पोळले आहेत तव्यात
एकीवर तेल पडले आहे कढईतले उकळते
इस्पितळात हजार टक्के भाजलेल्या स्त्रीचा कोळसा नोंदावातोय
आपल्या मृत्युपूर्व जबानीत की-कोणीही जाळले नाही तिला
तिच्याशिवाय बाकी सगळेच आहेत निर्दोष
अगदी चुकून तिच्याच हातून फुटले तिचे नशीब आणि भडकला स्टोव्ह
एक स्त्री नाकातून ओघळणारे रक्त पुसत बोलतेय
शपथ घेऊन सांगते ,माझ्या भूतकाळात कुठेच नव्हते प्रेम
तिथे होती एक पवित्र ,शतकांएवढी जुनाट धगधगती भयाण शांतता
ज्यात झिजत राहिला फक्त तुमच्याचसाठी माझा देह
एका स्त्रीचा चेहरा संगमरवरासारखा पांढराफटक
तिने कदाचित कुणालातरी सांगितले आहे आपले दु:ख किंवा तिच्या
हातून हरवला आहे एखादा दागिना
एक छताच्या वाशाला बांधते आहे ओढणी
तिच्या प्रियकराने सार्वजनिक केले आहेत तिचे फोटो आणि पत्र
एक स्त्री फोन पकडून रडतेय
एक स्वत:शीच बरळत कुठल्याशा भावनातिरेकात पळतच येते बाहेर
रस्त्यावर
अस्ताव्यस्त केसांसह , कोणत्याही कपड्यांविना
काही स्त्रिया बस स्थानकांवर किंवा रेल्वे फलाटांवर उभ्या आहेत विचारत
की त्यांना कोणत्या गाडीत बसून कुठे जायचे आहे या जगात
एक स्त्री हतबल होऊन म्हणते आहे की-तुला जे करायचे आहे माझ्याशी
ते कर पण मला कसं तरी जगू दे फक्त
एक सापडलीये मेलेली … शहराच्या अगदी गजबजलेल्या बागेत
आणि तिच्या शवापाशी बसून रडतो आहे तिचा दीड वर्षांचा मुलगा
तिच्या झोळीत मिळते दुधाची एक रिकामी बाटली ,
प्लास्टीकचा एक छोटासा पेला
आणि हिरव्या-पिवळ्या रंगाचा एक चेंडू
ज्याला हलवल्यावर आताही येतो आहे त्यातून
खुळखुळयासारखा आवाज
एक स्त्री जी यासिडने भाजली आहे,खूश आहे किमान वाचला आहे
तिचा उजवा डोळा
एक स्त्री तंदूर भट्टीत जळताना आपली बोटे हलवते आहे हळूहळू
ती चाचपून पाहते आहे बाहेरचा अंधार
एक फरशी पुसते आहे
एक भांडी घासते आहे
एक कपडे धूत आहे
एक मुलाला पोत्यावर झोपवून रस्त्यावर खडी पसरवते आहे
एक फरशी पुसता पुसता बघतेय राष्ट्रीय च्यानेलवरची फ्याशन परेड
एक वाचतेय बातमी की संसदेत वाढणार आहे त्यांची टक्केवारी
एका स्त्रीचं काळीज जे लप्पकन पोत्यातून पडलं आहे बाहेर
सांगतं आहे-फेकून कुठल्या तरी नाल्यात मला,लवकर परत ये
मुलांना शाळेसाठी उठवायचं आहे लवकर
नाश्ता त्यांना जरूर दे,कणिक मी मळूनच आले होते
राजधानीतल्या पोलिस चौकीच्या गेटवर बसल्यात दोन स्त्रिया जमिनीवर
एकमेकीला बिलगून गुपचूप
पण साऱ्या ब्रम्हांडात घुमतो आहे त्यांचा हाहाकार
हजारो लाख्खो दडून बसतात गर्भाच्या अंधारात
या जगात जन्म घ्यायला नाकारत
तिथेही त्यांना शोधून काढतात हेर ध्वनितरंग
तिथेही,जाते हत्यारी कट्यार स्त्री-अर्भकाच्या आरपार .

-उदय प्रकाश
अनुवाद-राहुल कोसंबी ,मुक्त शब्द एप्रिल २०१३' मधून

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...