पोलीस दलाच्या कुटुंब प्रमुखाची जबाबदारी पार पाडतानाच, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून पोलीस प्रशासनाला अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हे आपल्या 'अभिनव' उपक्रमांची मात्रा लागू करण्यात यशस्वी ठरले आहेत. फेब्रुवारी २०१४ ला डॉ. देशमुख यांनी सातारा पोलीस अधीक्षकपदी पदभार घेतला. त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी आचारसंहिता काळातच त्यांनी आपले कसब पणाला लावले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून 'ड्रंक आणि ड्राईव्ह'च्या मागील वर्षांपेक्षा म्हणजे १५० केसेस केल्या. धाबे, हॉटेल्स लवकर बंद करण्यावर भर दिला. विशेष मोहीम राबवून पाहिजे फरारी आरोपींना रात्रीतून नॉन बेलेबल वॉरंट बजावणे आदीबरोबरच २७ ठिकाणी नाकाबंदी केली. यामध्ये ३१ अनधिकृत शस्त्रे जप्त केली. हे प्रमाण गतवर्षी पेक्षा दुप्पट आहे.
२००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत मार्ढी येथे झालेले फायरींग आणि ३०७ कलमाखाली दाखल झालेले २ गुन्हे यांची दखल घेत यंदाच्या निवडणुकीत त्यांनी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या समन्वयाने माण व खटाववर अधिक 'फोकस' दिला. प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून तडीपारीचे प्रस्ताव पाठविले. सर्वाधिक फौजफाटा दिला. त्याचबरोबर परवानाधारक ८० टक्के शस्त्रे ताब्यात घेतली.
महामार्गावर होणाऱ्या लुटमारीच्या प्रकरणात उंब्रज, दहिवडी, वडूज पोलीस ठाण्याकडून गुन्हेगारांवर मोक्काचे प्रस्ताव पाठवून कारवाई करण्यात आली. तर कराडमधील खून प्रकरणात एका आरोपीवर मोक्काची कारवाई करण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांवर जरब बसून गेल्या वर्षीच्या तुलनेत सोनसाखळी चोरी, घरफोडीच्या प्रकरणात निश्चीतपणे घट झालेली दिसून येते. मध्यंतरी सोशल मीडियावरुन झालेल्या प्रकरणात २०० आरोपींना अटक करण्यात आली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. आणि पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने परिस्थती हाताळल्यामुळे अल्पसंख्याक आयोगाने भेट देवून प्रशासनाचे कौतुक केले होते.
अशा प्रकरणात युवकांना सकारात्मक बनविण्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी जिल्ह्यातील १५० महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी पत्रव्यवहार करुन विद्यार्थ्यांना 'रिस्पॉन्ड करा, रिऍ़क्ट होऊ नका' असा संदेश देऊन आवाहन केले. यासाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी महाविद्यालयांमध्ये सोशल मीडिया हाताळण्याबाबत कार्यशाळा घेतली. डॉ. देशमुख यांनी स्वत: ७ महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा घेतली. यामध्ये तरुणांना बोलते केले. त्यांच्यामध्ये जनजागृती करुन सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला. त्यामध्ये चांगले यश पोलीस प्रशासनाला मिळाले.
** अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी पारितोषिक योजना
दोन्ही निवडणुकीमध्ये अनधिकृत शस्त्र जप्त करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी डॉ. देशमुख यांनी १० हजाराचे पारितोषिक जाहीर केले होते. तसेच चोरीला गेलेल्या वाहनांचा आणि चोराचा शोध लावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठीही २ हजार ५०० रुपयांचे पारितोषिक त्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे अनधिकृत शस्त्रे जप्तीमध्ये आणि चोरीस गेलेल्या वाहनांच्या गुन्ह्यांचा उकल झालेला दिसून आला.
**२ जानेवारीपासून 'नागरी सुविधा केंद्र आणि पोलीस आपल्या दारी' उपक्रम
२ जानेवारी १९६० रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. याचे औचित्य साधून गेल्या ३ वर्षापासून 'रेझींग डे' साजरा करण्यात येतो. या निमित्ताने २ जानेवारी २०१५ पासून जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी सुविधा केंद्राच्या धर्तीवर पोलीस मुख्यालयामध्ये नागरी सुविधा केंद्र सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक अर्जदाराला त्याचा अर्ज किती दिवसात निर्गत करण्यात येईल, याबाबत त्याला टोकन देण्यात येणार आहे व त्याचा अर्ज त्यानंतर तपास करुन निकाली काढण्यात येईल.
सातारा शहरासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस ठाण्यांची संख्या कमी आहे. यावर उपाय म्हणून 'पोलीस कंट्रोल रुम व्हॅन' (पीसीआर) ही सुविधा सातारा शहरासाठी सुरु होणार आहे. यामध्ये संबंधित नागरीकांनी १०० क्रमांकावर संपर्क केल्यास १०0 मिनिटात पोलीस व्हॅन अथवा पोलीस मोटार सायकल संबंधित नागरीकाकडे जाईल व त्याला सुविधा देईल. यासाठी ३ सुमो आणि ६ मोटार सायकल कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. ही वाहने ठराविक कालावधीत शहरातील गर्दीच्या ठिकाणी राहणार आहेत. उदा. सकाळी महाविद्यालयाच्या परिसरात, दुपारी बँका, एसटी स्टॅन्ड आदी गर्दीच्या ठिकाणी राहतील. असे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. यामधून नागरिकांना निश्चितपणे समाधान मिळेल आणि पोलीस प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख होण्यास मदत होणार आहे. या दोन्ही योजना डॉ. देशमुख यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला राबविण्याचे ठरविले आहे.
डॉ. देशमुख यांनी औरंगाबाद शासकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी संपादन केली असल्यामुळे त्यांच्या या ज्ञानाचा पोलीस दलासाठी ते पुरेपूर वापर करत आहेत. सर्वप्रथम अधिकारी व कर्मचारी यांना बोलावून घेऊन त्यांच्या सोयीनुसार बदल्या केल्या. त्याचबरोबर रजेचे विकेंद्रीकरण करुन मोठ्या अर्जित रजा वेळापत्रकानुसार प्रत्येक महिन्यात १० टक्के कर्मचाऱ्यांना देण्याबाबत कार्यवाही केली. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढून त्यांना रजा लवकर मिळत असल्याने आजारपणाच्या रजेवर जाण्याचे प्रमाण निश्चीतपणे कमी झाले आहे. अधिकारी, कर्मचारी यांच्या शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता वाढविण्यासाठी आणि ताणतणाव कमी करण्यासाठी आरोग्य शिबीरे घेण्यावर त्यांचा भर राहिला आहे. केवळ अधिकारी, कर्मचारी यांच्या आरोग्याची काळजी न घेता त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजीही डॉक्टरकीच्या नात्याने ते घेतात. विविध चाचण्या करण्याबाबत ते मार्गदर्शन करतात. तसेच सल्लेही देतात.
खून, बलात्कार आदींच्या गुन्ह्यांमध्ये त्यांच्या डॉक्टरकीच्या ज्ञानाचा ते पुरेपूर वापर करत असल्याने तपास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मानसिक बल वाढून गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये यंदाच्या खून प्रकरणांबरोबरच मागील वर्षातील खून प्रकरणे उघडकीस आली आहेत. अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांच्या संगणक साक्षरतेमध्ये सातारा जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे. दृष्ट लागावी अशी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची देखणी इमारत कराड येथे उभी करण्यामध्ये डॉ. देशमुख यांचा वाटा मोठा आहे. मृदु स्वभाव, वैद्यकीय ज्ञानाचा पुरेपूर वापर, आधुनिक यंत्रणांचा वापर आणि गेल्या वर्षभरातील अभिनव उपक्रमांमुळे डॉ. देशमुख यांची मात्रा खऱ्या अर्थाने पोलीस दलाबरोबरच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लागू पडलेली आहे.
- प्रशांत सातपुते, माहिती अधिकारी (सातारा )
http://sataratoday.com/MoreContentpage.aspx?q=9463#sthash.Exs9DIhh.dpuf