‘IVF’चा प्रवास ‘डिझायनर बेबी’पर्यंत

आयव्हीएफ तंत्रामुळे १९७८मध्ये जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी जन्मली. त्याच्या २० वर्षांनंतर, म्हणजे १९९८ मध्ये औरंगाबादेत पहिला टेस्ट ट्यूब बेबी बॉय जन्माला आला. तंत्रज्ञानाच्या अफाट प्रगतीमुळेच 'आयव्हीएफ'चा सक्सेट रेट ७ ते १० टक्क्यांवरून ६० ते ७० टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, लवकरच विस्तारित पीजीडी तंत्रज्ञानामुळे पाहिजे त्या रंगरूप-उंची-आकार आणि अनुवंशिक गंभीर-दुर्धर आजार-विकार टाळून खात्रीशीर सुदृढ मूल जन्माला घालणे शक्य होणार आहे. पाश्चात्य देशांत हे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. भारतामध्येही अशा प्रकारची 'डिझानर बेबी' नजिकच्या भविष्यात कधीही जन्मू शकते, अशी परिस्थिती आहे. डॉ. रॉबर्ट एडवर्ड व डॉ. पॅट्रिक स्पेप्टो यांच्या अथक परिश्रमातून आणि शंभरपेक्षा जास्त प्रयोग अयशस्वी झाल्यानंतर १९७७मध्ये 'इन व्हिट्रो फर्टिलायझेशन' (आयव्हीएफ) तंत्र यशस्वी झाले आणि १९७८मध्ये लुईस ब्राऊन ही पहिली टेस्ट ट्यूब बेबी लंडनमध्ये जन्मली. १९९८ मध्ये आैरंगाबादेतील पहिली टेस्ट ट्युब बेेबी बॉय जिल्ला हॉस्पिटलमध्ये जन्मला. यासंदर्भात जिल्ला हॉस्पिटलच्या ज्येष्ठ स्त्रीरोग-वंध्यत्वतज्ज्ञ डॉ. मंजू जिल्ला 'मटा'ला म्हणाल्या, 'लुईस ब्राऊनला झालेली दोन्ही मुले ही नैसर्गिक प्रसुतीद्वारे झाली आहेत आणि अशी अनेक उदाहरणे आहे. त्यामुळे आयव्हीएफ तंत्राचा कुठलाही दुष्परिणाम होत नसल्याचे स्पष्ट झाले. पाश्चात्य महिलांमधील 'फॅलोपियन ट्यूब'च्या मोठ्या समस्येमुळे या तंत्राला प्रचंड मागणी होती व तंत्रज्ञान झपाट्याने विकसित गेले. स्त्री बिजकोषामध्ये थेट शुक्राणू सोडण्याच्या 'इक्सी' तंत्राने सक्सेस रेट वाढला. 'पीजीडी' तंत्रज्ञानाने शंभर टक्के निर्दोष गुणसूत्रांची निवड करणे शक्य झाले असून, त्यामुळे सक्सेस रेट ६० ते ७० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. अर्थात, लॅबमधील अत्युच्च तंत्रज्ञान, तज्ज्ञांवर सक्सेस रेट अवलंबून असून, सर्वसाधारणपणे भारतात ५० टक्क्यांपर्यंत हा रेट आहे. आता तर जन्माला येणाऱ्या मुला-मुलीचा अपेक्षित रंग-केशरचना-उंची व इतर शरीररचनाही तीन प्रकारच्या पीजीडी तंत्रामुळे शक्य झाले आहे.'

इक्सी, लेझर अॅसिस्टेड तंत्र, लॅबमधील क्लास १०० तंत्र, औषधी-इंजेक्शनमुळे सक्सेस रेट ५० टक्क्यांपर्यंत आणणे शक्य झाले आहे. अर्थात, अजूनही तंत्रज्ञान विकसित होण्यास मोठा वाव आहे. वंध्यत्वाचे प्रमाण वाढत असताना हे तंत्रज्ञान मानवासाठी कल्याणकारी ठरत आहे.

ज्या गोष्टींचे जगाला काहीच नवल वाटत नाही अशा गोष्टींना भारतात डोक्यावर घेतले जाते.

इंग्रजी :-
जगात कुठेही नसेल इतके महत्व भारतात इंग्रजी भाषेला दिले जाते इंग्रजी बोलता येत नसेल तर तो अडाणी समजला जातो ... अरेरे !!!
गोरेपणा : -
गोरेपणाला भारतीय मुर्ख मंडळी एवढे भुललेत की या गोष्टीचा फायदा घेउन काही नामवंत कंपन्या गोरे बनवन्याच्या क्रिम तयार करुन दरवर्षी हजारो कोटी रुपये कमवतात !
रिअॅलिटी शो :-
यात तर सगळं ठरवुन केलं जातं आणि भारतीय मुर्खासारखे खरं समजुन बघत बसतात ! त्यामुळे वास्तविक खरोखर असणारे कलाकार पडद्यामागेच राहतात हेच खुप मोठे दुर्दैव आहे !
लग्नसमारंभ :-
बडेजाव आणि प्रतिष्ठा दाखवण्याचा सर्वात मोठा मार्ग काही मुलींच्या बापांना तर मुलगीच्या विदाई पेक्षा दिखावा महत्वाचा वाटतो !
इंजीनियरिंगची पदवी :-
७० % मुलांच्या बापांना आपल्या मुलाने समाजसेवक, नामवंत खेळाडु, देशभक्त बनन्यापेक्षा इंजीनियरिंग पदवी मिळवुन श्रीमंत बनावं असेच वाटते. बाकीच्या क्षेत्रात नोकरी करणे काय पाप आहे का ??
क्रिकेट :-
भारतात क्रिकेट हा खेळ नसुन धर्मच मानुन त्याची पुजा केली जाते ! लाखोंची सट्टेबाजी चालते ! भारतातील इतर अनेक खेळांना जगात डिमांड मिळते भारतात फक्त क्रिकेटच पाचवीला पुजलाय !
सोने -
जगात ज्या सोन्याचा सर्वांना कंटाळा येतो तेच सोने मिळवण्यासाठी भारतीय महिला जणु काय शपथच घेउन बैसल्यात ! त्याच सोन्याची भारतात जीवघेणी चोरी सुद्धा होते वा काय छान दुर्दैव आहे !
लोक काय म्हणतील ?
हे केले तर लोक काय म्हणतील... ते खाल्ले तर लोक काय म्हणतील... हे कपडे घातले तर लोक काय म्हणतील.... अरे काय चाललय ?? लोकांच्या म्हणण्याने चालाल तर मुर्ख बनाल ! आत्महत्या करणारे पऩ हाच विचार करतात लोक काय म्हणतील ??? मी तर यांना आर्धवटच म्हणतो
बोर्डाची परिक्षा :-
जगात कुठे इतके महत्व दिले जात नाही येवढे भारतात बोर्डाच्या परिक्षेला महत्व दिले जाते ! किती तरी मुलं तर बोर्डाची परिक्षा ऐकुनच येवढे घाबरतात की ते परिक्षेला सुद्धा जात नाहीत
परदेशी ब्रँड : -
ज्या वस्तु परदेशात कचर्यात टाकुन दिल्या जातात त्या गोष्टी भारतात लाखों रुपये मोजिन खरेदी केल्या जातात ! जे पदार्थ परदेशात जनावरांना खायला देतात तेच पदार्थ भारतात कधी कधी माणसांच्या नावावर खपवले जातात... कसले हे दुर्दैव !
भारतातील ज्या इतिहासाचा जगात आदर्श घेतला जातो तोच इतिहास भारतात चुकीचा आणि खोटा सिद्ध केला जातो !
कमाल आहे राव...

पुरूषांनो, एव्हढं करून दाखवा !

एव्हढं करून दाखवा,
पुरुषांनो, एव्हढं करून दाखवा
दरवर्षी शब्दांची तीच फोलपटं सांडवण्यापेक्षा
आमच्यासाठी....एव्हढं करून दाखवा
एका तरी पुरूषाने... .सती जाऊन दाखवा
आवडत्या(?) बायकोसाठी
बघायचंय आम्हाला
खाली जाळ लागताच.... बुडाला
कसे येताय केकाटत; टुण्णदिशी उडी मारून
सरणावरून, पेटलेले बुड घेऊन
हात जोडत; ही रूढी बदलण्यासाठी
एक करून दाखवा
आपल्या लाडक्या(?) लेकीला
स्वतः जन्म देऊन दाखवा... एकदातरी पुरुषाने
बघायचंय आम्हाला
कसे बोंबलत ठणाणा; मरणप्राय कळांनी
सहन करताय ते....की उलट
हात जोडत रडताय...नशीबाजवळ
हा निसर्गनियम बदलण्यासाठी
एक करून दाखवा
ईतिहासात जाऊन... थोबाडीत मारून दाखवा
युधिष्ठीराच्या आणि... समस्त पुरूषी बिनडोकांच्या
पत्नीपेक्षा धर्म श्रेष्ठ; हे ढोंग उगाळल्याबद्दल
करून दाखवा शीर धडावेगळे; दु:शासनाचे
त्याचवेळी.... वस्त्रे पुरवण्यापेक्षा
बघायचीय; तुमची मर्दुमकी(?) आणि प्रेम
एक करून दाखवा
झोपला असाल किंवा नसाल.... कोणा दुसरीसोबत
तरी..... वनात जाऊन दाखवा; काही वर्षं तरी
किंवा अग्नीपरिक्षा..
धोब्याने सर्टीफिकेट दिले तरी; आमच्यासाठी
बघायचंय आम्हाला....तुमचा त्याग, समर्पण
तडफड; आमच्यासाठी
आणि, नसाल करू शकत हे
ढोंग्यांनो; तर बंद करा हे नाटक
भाट बनून, एका दिवसापुरते..... थोतांड!
दिनाबिनाचे..... नाही गरज आम्हाला
या गायपोळ्याची..... आमच्या जन्मजन्मांच्या जखमांवर
शब्दांची झूल पांघरण्याची
माहित आहे आम्हाला; आमचे मोठेपण, महती
आम्ही आहोत; समर्थ आता....जगण्यास, जगवण्यास
आणि एक करून दाखवा
हे शेवटचे;
टाका हा ईतिहास गाडून; टाका त्या पोथ्या जाळून
करा तर्पण मूर्ख रूढ्यांचे, जाळा मढे अक्कलशून्य परंपरांचे
आणि द्या साथ; आम्हाला एक मित्र म्हणून
जगण्याच्या समान हक्कासाठी
निदान एव्हढे तरी
कराल ना....
आमच्यासाठी?
कवी- उमेश कोठीकर .

स्त्रिया

एक स्त्री आपल्या पर्समधून एक फुटकळ नोट काढून कंडक्टरकडून घरच्या परतीचे तिकीट मागत आहे
तिच्यावर अगदी आत्ताच ,काही वेळापूर्वी झाला आहे बलात्कार
त्याच बसमध्ये एक दुसरी स्त्री आपल्यासारख्याच लाचार
समवयस्क दोन-तीन स्त्रियांशी
पदोन्नती आणि महागाई भत्त्याविषयी बोलते आहे
कार्यालयातील तिच्या वरिष्ठांनी तिला आज पुन्हा मेमो दिला आहे
एक स्त्री जिने अखंड सौभाग्यवती राहण्यासाठी ठेवले आहे
करवा चौथचे निर्जल व्रत
ती पती वा सासूच्या हातून मारले जाण्याच्या भीतीने गाढ झोपेतूनच
किंचाळत उठते अचानक
एक स्त्री अर्ध्या रात्री बाल्कनीत उभी आहे बघत वाट
आपल्यासारख्याच असुरक्षित आणि असहाय कुण्या दुसऱ्या स्त्रीच्या घरून
परतणाऱ्या आपल्या दारुड्या नवऱ्याची
संशय-शंका , असुरक्षितता आणि भीतीने वेढलेली एक स्त्री मार खाण्याआधी
अतिशय दबल्या आवाजात विचारते आहे आपल्या नवऱ्याला की -
कुठे खर्च झाले तुमच्या पाकिटातल्या पगारातील अर्ध्यापेक्षा जास्त पैसे?
एक स्त्री आपल्या मुलाला आंघोळ घालताना रडू लागते उगीचच
हमसून हमसून
आणि मुके घेते त्याचे वेड्यासारखे पटापटा
आणि शोधू पाहतेय त्याच्या भविष्यात आपल्यासाठी एखादे शरणस्थळ
किंवा एखादी गुहा
एका स्त्रीचे हात पोळले आहेत तव्यात
एकीवर तेल पडले आहे कढईतले उकळते
इस्पितळात हजार टक्के भाजलेल्या स्त्रीचा कोळसा नोंदावातोय
आपल्या मृत्युपूर्व जबानीत की-कोणीही जाळले नाही तिला
तिच्याशिवाय बाकी सगळेच आहेत निर्दोष
अगदी चुकून तिच्याच हातून फुटले तिचे नशीब आणि भडकला स्टोव्ह
एक स्त्री नाकातून ओघळणारे रक्त पुसत बोलतेय
शपथ घेऊन सांगते ,माझ्या भूतकाळात कुठेच नव्हते प्रेम
तिथे होती एक पवित्र ,शतकांएवढी जुनाट धगधगती भयाण शांतता
ज्यात झिजत राहिला फक्त तुमच्याचसाठी माझा देह
एका स्त्रीचा चेहरा संगमरवरासारखा पांढराफटक
तिने कदाचित कुणालातरी सांगितले आहे आपले दु:ख किंवा तिच्या
हातून हरवला आहे एखादा दागिना
एक छताच्या वाशाला बांधते आहे ओढणी
तिच्या प्रियकराने सार्वजनिक केले आहेत तिचे फोटो आणि पत्र
एक स्त्री फोन पकडून रडतेय
एक स्वत:शीच बरळत कुठल्याशा भावनातिरेकात पळतच येते बाहेर
रस्त्यावर
अस्ताव्यस्त केसांसह , कोणत्याही कपड्यांविना
काही स्त्रिया बस स्थानकांवर किंवा रेल्वे फलाटांवर उभ्या आहेत विचारत
की त्यांना कोणत्या गाडीत बसून कुठे जायचे आहे या जगात
एक स्त्री हतबल होऊन म्हणते आहे की-तुला जे करायचे आहे माझ्याशी
ते कर पण मला कसं तरी जगू दे फक्त
एक सापडलीये मेलेली … शहराच्या अगदी गजबजलेल्या बागेत
आणि तिच्या शवापाशी बसून रडतो आहे तिचा दीड वर्षांचा मुलगा
तिच्या झोळीत मिळते दुधाची एक रिकामी बाटली ,
प्लास्टीकचा एक छोटासा पेला
आणि हिरव्या-पिवळ्या रंगाचा एक चेंडू
ज्याला हलवल्यावर आताही येतो आहे त्यातून
खुळखुळयासारखा आवाज
एक स्त्री जी यासिडने भाजली आहे,खूश आहे किमान वाचला आहे
तिचा उजवा डोळा
एक स्त्री तंदूर भट्टीत जळताना आपली बोटे हलवते आहे हळूहळू
ती चाचपून पाहते आहे बाहेरचा अंधार
एक फरशी पुसते आहे
एक भांडी घासते आहे
एक कपडे धूत आहे
एक मुलाला पोत्यावर झोपवून रस्त्यावर खडी पसरवते आहे
एक फरशी पुसता पुसता बघतेय राष्ट्रीय च्यानेलवरची फ्याशन परेड
एक वाचतेय बातमी की संसदेत वाढणार आहे त्यांची टक्केवारी
एका स्त्रीचं काळीज जे लप्पकन पोत्यातून पडलं आहे बाहेर
सांगतं आहे-फेकून कुठल्या तरी नाल्यात मला,लवकर परत ये
मुलांना शाळेसाठी उठवायचं आहे लवकर
नाश्ता त्यांना जरूर दे,कणिक मी मळूनच आले होते
राजधानीतल्या पोलिस चौकीच्या गेटवर बसल्यात दोन स्त्रिया जमिनीवर
एकमेकीला बिलगून गुपचूप
पण साऱ्या ब्रम्हांडात घुमतो आहे त्यांचा हाहाकार
हजारो लाख्खो दडून बसतात गर्भाच्या अंधारात
या जगात जन्म घ्यायला नाकारत
तिथेही त्यांना शोधून काढतात हेर ध्वनितरंग
तिथेही,जाते हत्यारी कट्यार स्त्री-अर्भकाच्या आरपार .

-उदय प्रकाश
अनुवाद-राहुल कोसंबी ,मुक्त शब्द एप्रिल २०१३' मधून

मुसलमान समाजात देखील खूप मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा आहेत

मुसलमान समाजात देखील खूप मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा आहेत आणि त्या अज्ञानापायी जोपासल्या जातात अनेक दर्ग्यात असले प्रकार आपल्याला पाहायला मिळतात त्यापैकीच एक म्हणजे एका बोटाने दगड उचलला जाणे होय, भक्तांनी केवळ आपले बोट लावले तरी तो दर्ग्यातला दगड उचलला जातो हा प्रकार करीम आली दर्ग्यात साताऱ्यात होत होता त्याची पोलखोल शेवटी अंनिस ने केली.. त्यात सामील असणारे बदमाश मात्र दगडाला बळ लावत असतात आणि भक्ताला वाटते केवळ एका बोटाने मोठा दगड उचलला जातोय... हीच आहे भोंदुगिरी..
अंधश्रद्धा सर्वच धर्मात आहेत... हल्ली प्रबोधानात जो निकष हिंदू धर्माला लावला जातो... तो इतर कूठल्या धर्माला लावला जात नाही त्यामुळे एका धर्मातील अंधश्रद्धेबद्दल बोलणं बरोबर नाही.. जेव्हा शिकलेला माणूस अशा गोष्टीवर श्रध्दा ठेवतो तेव्हाच ती अंधश्रद्धा होते.. चिकीत्सा ही सर्व धर्मांची झाली पाहीजे... जसे आपण हिंदू धर्मपुराणकथा, हे सर्व थोतांड आहे असे म्हणतो... अश्याच प्रकारचे थोतांड हे मुस्लीम-खिश्चन इतर धर्मात आहे.. त्याविरूद्ध बोलण्याची धमक सुद्धा आपणात असावी.. अन्यथा हे बेगडेपणच ठरेल...

अंधश्रद्धा सर्वच धर्मात आहे. कट्टरता देखील सर्वच धर्मात आहे. पण प्रत्येकाला वाटत की आपल्या धर्मातील अंधश्रद्धा फारशी घातक नाही पण दुसऱ्या धर्मातील अंधश्रद्धा मात्र फार घातक आहे त्यामुळे बहुतेक जण दुसऱ्या धर्मातील अंधश्रद्धेवर बोलतो.. माझाच धर्म सर्वश्रेष्ठ ही जगातील सर्वात मोठी अंधश्रद्धा !!
Dr tambe, Sattar Shaikh, sakya nitin, vaibhav kokat, nikesh jithe.

ताराबाई बापूजी शिंदे (१८५० - १९१०)

स्त्रीवादी दृष्टिकोनातून आपल्या संस्कृतीचा तर्कशुद्धपणे वेध घेणारी, स्त्री-पुरुष समानतेचा विचार मराठीतून सर्वप्रथम स्पष्टपणे मांडणारी एकोणिसाव्या शतकातील विचारवंत स्त्री म्हणून ताराबाई शिंदे परिचित आहेत. विधवांच्या प्रश्नांविषयी, पुनर्विवाहाविषयी आणि एकूणच त्या काळातल्या स्त्रियांच्या प्रश्नांविषयी त्यांनी अतिशय कणखर भाषेत मांडलेले विचार 'स्त्री-पुरुष तुलना' या ग्रंथातून १८८२ साली प्रसिद्ध झाले. काळाच्या बरंच पुढे जाऊन केलेलं, पुरुषी मानसिकतेवर घाव घालणारं त्यांचं हे लेखन त्या काळात प्रचंड खळबळ माजवणारं ठरलं. स्त्रीशिक्षणाचा फारसा प्रसार न झालेल्या त्या काळात ताराबाई शिंदे यांच्यासारख्या मराठा समाजातील एका स्त्रीने समाजाच्या ज्वलंत प्रश्नासंबंधी इतक्या परखडपणे आपले विचार या ग्रंथातून मांडावेत, ही अपवादभूतच कृती होती.
ताराबाई शिंदे यांचा जन्म वऱ्हाड(विदर्भ) प्रांतातील बुलठाणी(बुलढाणा) येथे एका सधन कुटुंबात झाला. त्यांचे वडील बापूजी हरी शिंदे हे श्रीमंत जमीनदार होते, तसेच ते डेप्युटी कमिशनरच्या कार्यालयात हेडक्लार्कची नोकरीही करत होते. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या 'सत्यशोधक समाजा'चेही ते कार्यकर्ते होते. त्यामुळे या चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांची त्यांच्या घरी ऊठबस असायची. बापूजी शिंदे यांना ताराबाई ही एकुलती एक कन्या आणि चार पुत्र होते. जन्मजात बुद्धिमान असलेल्या ताराबाई वडिलांच्या खूप लाडक्या होत्या. त्या काळाचा विचार करता ताराबाईंना त्यांच्या वडिलांनी चांगल्यापैकी शिक्षण दिल्याची नोंद आहे, पण त्यांचं नक्की शिक्षण कितपत झालं याची माहिती उपलब्ध नाही. ताराबाईंना मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांचं उत्तम ज्ञान होतं. त्यांचं वाचन चौफेर होतं. त्या काळातली महत्त्वाची मराठी, इंग्रजी वृत्तपत्रं त्या नियमितपणे वाचत असत. महाकाव्यं, संस्कृत नाटकं, धर्मग्रंथ, काव्यग्रंथ यांचंही त्या भरपूर वाचन करीत. या वैविध्यपूर्ण वाचनामुळे त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्या, प्रगल्भ होत गेल्या.
ताराबाईंना लग्न करायची फारशी इच्छा नव्हती, परंतु त्या काळच्या चालीरीतींना अनुसरून त्यांच्या वडिलांनी त्यांचं लग्न ठरवून त्यांना घरजावई आणला. पण थोड्याशा अनिच्छेनेच केलेल्या या विवाहामुळे ताराबाईंना संसारसुख काही मिळालं नाही. त्यांना मूलही झालं नाही. त्यातच त्यांचं घराणं खानदानी असल्यामुळे त्यांच्याकडे गोषापध्दती होती. ती मात्र त्यांनी जुमानली नाही. कारण मुळातून त्या करारी, धाडसी आणि निर्भीड स्वभावाच्या होत्या. गावात आणि परिसरात त्यांचा दरारा होता. कोर्टकचेरीच्या कामासाठी त्या घोड्यावर बसून जात असत. शेतीचीही देखभाल त्या करीत. उत्तरायुष्यात त्यांना वैधव्य प्राप्त झालं; पण त्या काळातल्या प्रथेप्रमाणे 'सांदीचं खापर' होऊन जगण्याचं त्यांनी नाकारलं. अशा त्यांच्या धाडसी कृत्यांना त्यांच्या वडिलांनीही पाठिंबा दिला.
दरम्यानच्या काळात सुरत येथील विजयालक्ष्मी नामक ब्राह्मण विधवेने व्यभिचार करून गर्भपात केला म्हणून सुरत न्यायालयाने या विधवेला फाशीची शिक्षा सुनावली होती. तिने मुंबई न्यायालात अपील केल्यानंतर ही शिक्षा पाच वर्षांच्या सक्तमजुरीत बदलण्यात आली. 'टाइम्स ऑफ इंडिया' वृत्तपत्राच्या २६ मे १८८१ रोजीच्या अंकातील ही बातमी आणि त्यानंतर 'पुणेवैभव'सारख्या सनातनी वृत्तपत्रांनी स्त्रीजातीविरुद्ध उठवलेली टीकेची झोड या गोष्टी ताराबाईंना 'स्त्री-पुरुष तुलना' अथवा 'स्त्री आणि पुरुष यांत साहसी कोण' हे स्पष्ट करून दाखविणारा निबंध लिहिण्यासाठी निमित्त ठरल्या. नोव्हेंबर-डिसेंबर १८८१ मध्ये त्यांनी लेखनाला सुरुवात केली, आणि पुढे १८८२ मध्ये पुण्यातील शिवाजी छापखान्यात छापून हा बावन्न पानी निबंध पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला. हे पुस्तक प्रकशित होताच तत्कालीन समाजात एकच खळबळ उडाली. भारतीयच नव्हे तर जागतिक पातळीवर स्त्रियांच्या व्यथा-वेदनांना प्रथमच वाचा फोडणाऱ्या या ग्रंथावर त्या काळातल्या सनातनी विचारांच्या लोकांनी टीकेची प्रचंड झोड उठवली; पण थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८८५ मध्ये 'सत्सार'च्या दुसऱ्या अंकात या ग्रंथावर विस्तृत लेख लिहून ताराबाईंच्या विचारांचं जाहीर समर्थन केलं.
वरील विधवेची शोकांतिका ताराबाईंना हा ग्रंथ लिहिण्यासाठी निमित्त ठरली असली, तरी या निमित्ताने एकूण स्त्रीजातीवर घेतल्या जाणाऱ्या अनेक आक्षेपांचं खंडन करण्याच्या व्यापक हेतूनेच त्यांनी लेखणी उचलली, हे त्यांच्या या ग्रंथासाठी त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतून स्पष्ट होतं. त्यात त्या म्हणतात, ''…रोज पुरुषांचे साहस, धाडस व दगाबाजीची नित्य नवी भयंकर उदाहरणे दिसून येत असताही तिकडे कोणीच लक्ष न देता स्त्रियांवरच सर्व दोषांची गोणी लादतात, हे पाहून स्त्रीजात्याभिमानाने माझे मन अगदी खळबळून, तळतळून गेले. त्यामुळे मला निर्भीड होऊन असेच खडखडीत लिहिल्यावाचून राहवेना.'' कोण्या एखाद्या स्त्रीच्या हातून एखादा प्रमाद घडला की तिच्यावर अनेक कुत्सित आक्षेप घेण्याच्या व बायका या जात्याच घातकी आणि निसर्गत:च अनैतिकतेकडे कल असणाऱ्या असतात, असे ताशेरे झोडणारी त्या काळच्या समाजव्यवस्थेतील पूर्वापार चालत आलेली वृत्तीच सनातनी वृत्तपत्रांतील टीकेच्या रूपाने प्रकट झाली होती. या निबंधात ताराबाईंनी या वृत्तीचा परखड शब्दांत समाचार घेतला. स्त्रियांना दिले जाणारे सारे दोष स्त्रियांपेक्षा पुरुषांतच कसे जास्त आहेत आणि काही स्त्रियांत असे दोष आढळले तरी ते पक्षपाती शास्त्रनिर्बंधांमुळे, निर्दयी रूढींमुळे आणि प्रचलित पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळेच कसे निर्माण झाले आहेत हे त्यांनी या ग्रंथात स्त्री आणि पुरुष यांची पदोपदी तुलना करून सप्रमाण मांडले. बाईचं पाऊल वाकडं पडतं याला पुरूषच बहुधा जबाबदार असतात, असा युक्तिवाद करताना त्या म्हणतात, ''टाळी एका हाताने वाजत नाही, पण त्यातून उजवे हाताचा जोर जास्त असतो.''
पुनर्विवाहाविषयी त्यांनी म्हटलंय, ''पुनर्विवाह न करण्याची चाल महारोगाप्रमाणे अनेक ठिकाणी व जातींत पसरली आहे. त्यामुळे किती लाखो व कोट्यवधी स्त्रिया वैधव्याचे असह्य दु:ख कसकसे भोगीत असतील व भोगतील व त्यापासून कसकसे अनर्थ होत आहेत व होत असतील याची कल्पनासुद्धा करिता येत नाही.'' वैधव्य आलेल्या स्त्रीचं दु:ख मांडताना त्या पुढे म्हणतात, ''वैधव्याचे गाठोडे पदरात बांधून आपल्या भर्त्याचे गुण-अवगुण वाणीत व सर्व घरच्या-दारच्यांचा जाच काढीत मरून जातात.'' पुनर्विवाहबंदीमुळे तरुण विधवांचे पाऊल वाकडे पडून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भृणहत्या घडताहेत. एकट्या पुणे जिल्ह्यात पाच वर्षांत किमान एक हजार भृणहत्या होत असाव्यात असा अंदाज त्या काळात लोकहितवादींनी सरकारकडे पाठवलेल्या एका पत्रात व्यक्त केला होता. ताराबाई शिंदे यांनी व्यक्त केलेल्या भीतीला लोकहितवादींच्या या पत्रामुळे बळकटीच मिळते.
पुनर्विवाहबंदी तर्काला आणि वास्तवाला धरून कशी नाही हे स्पष्ट करताना त्या विचारतात, ''अरे, नवऱ्याआधी बायकोने मरावे किंवा नवऱ्याने बायकोआधी मरावे याचा तुमच्या बापजाद्यांनी देवांपासून काही दाखला आणला काय रे? मरणे किंवा जगणे हे तर त्या सर्व शक्तिमान नारायणाचे हाती.'
'एकदा सौभाग्य गेले म्हणजे स्त्रियांनी आपली तोंडे अगदी एखाद्या महान खुण्यापेक्षाही महाजबर अपराध्याप्रमाणे काळी करून सर्व आयुष्यभर आंधारकोठडीत राहावे?' हे त्यांना मान्यच नाही. पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेत अस्तित्वहीन झालेल्या स्त्रीला जगणं कसं अवघड होऊन बसलंय याविषयी त्यांनी अनेक मुद्दे या ग्रंथात मांडले आहेत. ही परिस्थिती बदलण्याची वेळ आली आहे असे सांगून न थांबता इंग्रज सरकारने विधवा पुनर्विवाहाचा कायदा करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
स्त्रीविषयी असलेल्या जातिवंत पोटतिडकीतूनच त्यांनी हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथातून ताराबाई शिंदे यांची बहुश्रुतता, समतोल विचार आणि शास्त्रीय दृष्टिकोन प्रकर्षाने समोर येतात. या ग्रंथात पोथ्या-पुराणांतील अनेक दाखले त्यांनी खऱ्याखोट्याची पारख करून, चिकित्सा करून दिले आहेत. यावरून ताराबाईंच्या चौफेर आणि चौरस वाचनाचा प्रत्यय येतो. त्या काळातल्या लोकप्रिय कथा-कादंबऱ्याही त्यांनी डोळसपणे वाचल्या होत्या. त्यातील पुरुषी मानसिकतेतून लिहिल्या गेलेल्या 'मुक्तामाला', 'मंजुघोषा', 'मनोरमा', 'विदग्ध स्त्रीचरित्र' आदी पुस्तकांत आलेल्या स्त्रियांच्या कामविव्हल प्रतिमाचित्रणावर त्यांनी आक्रमक हल्ले चढवले. त्यातील वर्णनं काल्पनिक, अवास्तव आणि स्त्रियांची बदनामी करणारी आहेत, असं परखड मत त्यांनी आपल्या लिखाणातून मांडलं.
'स्त्री-पुरुष तुलना' या ग्रंथात ताराबाई शिंदे यांनी वापरलेली भाषा आक्रमक आणि परखड असली तरी स्त्रीस्वातंत्र्याचा किंवा स्त्री-पुरुष समानतेचा अनिर्बंध पुरस्कार त्यांनी केलेला नाही. त्याचप्रमाणे पुरुषांना एकांगी दोषही दिलेला नाही.
या ग्रंथाची शैली अतिशय ओघवती आहे. या लिखाणाला परिणामकारकता आली आहे ती त्यांच्या जीवनानुभवाच्या परिघातीलच उपमानसृष्टीमुळे आणि त्या काळात स्त्रियांच्या तोंडी प्रसिद्ध असलेल्या अनेक लयदार म्हणी आणि वाक्प्रचार यांचा वापर केल्यामुळे. 'स्त्री-पुरुष तुलना' या मौलिक ग्रंथामुळे मराठीतील आद्य स्त्री लेखिका होण्याचा बहुमान मिळवलेल्या, लेखनाचे सुप्त गुण असलेल्या ताराबाई शिंदे यांनी नंतरच्या काळात काहीच लेखन कसं केलं नाही, हा प्रश्न मात्र अनाकलनीय आहे.
अधिक वाचनासाठी –
१. ताराबाई शिंदे-लिखित स्त्री-पुरुष तुलना (संपादक – विलास खोले), प्रतिमा प्रकाशन
२. ताराबाई शिंदे-कृत स्त्री-पुरुष तुलना (संपादक – डॉ. स. गं. मालशे), मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय
लेखन - महेंद्र मुंजाळ, युनिक फीचर्स.

सलाम अशा शिक्षकांना

रात्रशाळेत उजेड आणता-आणता ‘त्यांच्या’ आयुष्यात काळोख!
शाळेचे मुख्याध्यापक, क्लार्क अन् साफसफाई करणारे शिपाईही तेच, अशी तिहेरी भूमिका पार पाडणारे महापालिका रात्रशाळेतील प्रभारी मुख्याध्यापक एस. एच. काझी हे गेल्या २० वर्षांपासून २३९६ रुपये इतक्या तुटपुंज्या पगारावर राबत आहेत. सध्या शासनाच्या वतीने शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी धडपड सुरू आहे; तर दुसरीकडे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपडणारे काझी यांची मात्र महापालिकेच्या उदासीन भूमिकेमुळे परवड होत आहे.
कोल्हापुरात १९६१ मध्ये महापालिकेच्या राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या इमारतीत कर्मवीर भाऊराव पाटील रात्र प्रशालेची सुरुवात झाली. येथे आठवी ते दहावीपर्यंत सायंकाळी सात ते दहा वेळेत वर्ग भरतात. या शाळेत १९९५ ला एस. एच. काझी हे सहायक शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यावेळी शासनाच्या अनुदानासह आठवी ते दहावीपर्यंतच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या चांगली होती. एक मुख्याध्यापक, पाच शिक्षक, एक लिपिक, दोन शिपाई असा स्टाफ होता. मात्र, या शाळेकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत गेले. शाळेच्या खर्चाचे वेळेत कधी लेखापरीक्षणच केले गेले नाही. त्यामुळे अनुदानाची रक्कम जमा होणे बंद झाले. सर्व गोष्टींवर याचा परिणाम होऊ लागला. यादरम्यानच काही शिक्षक, लिपिक व शिपाईही निवृत्त झाले.
पर्यायाने २००८ ला एस. एच. काझी यांची प्रभारी मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, ते शाळेत एकमेव उरल्याने त्यांच्यावरच कामांची सर्व जबाबदारी आली. आपण शाळा सोडून गेलो तर शाळाच बंद पडणार, ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी गेली आठ वर्षे पडेल ते काम करीत शाळा टिकविण्यासाठी धडपड सुरू केली. त्यांनी प्रथम शाळेचे लेखापरीक्षण करून घेतले. त्यामुळे २८ लाखांचे अनुदान मंजूर झाले. मात्र, अनुदान घेण्यासाठी लागणाऱ्या काही अटींची पूर्तता महापालिका प्रशासनाने न केल्यामुळे अनुदान शाळेला मिळालेच नाही. महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने काझी नियमित महापालिका प्रशासनाकडे अनुदानाच्या अटींची पूर्तता करण्यासाठी धाव घेत आहेत. मात्र, त्यांची कोणीच साधी दखलही घेत नाहीत. यावर्षीच्या सुरुवातीपासून (२९ जानेवारी २०१५) सुभाषनगर येथील संत रोहिदास विद्यामंदिर येथे ही शाळा भरत आहे.
या शाळेत सध्या २२ विद्यार्थी आहेत. ८ वीमध्ये ६, ९वीमध्ये ११ व १० वीमध्ये ५ विद्यार्थी शिकत आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये हॉटेल, सेंट्रिंग कामगार व रिक्षाचालकांचा समावेश आहे. १९९४-९५ पर्यंत प्रत्येक वर्गात सरासरी ३८-४० विद्यार्थी असायचे. २०१०-११ दरम्यान ही संख्या १५ ते १६ वर येऊन थांबली. शिक्षकांची संख्या कमी झाल्याने विद्यार्थी संख्याही घटत गेली.
काझी यांनी मराठी, हिंदी आणि समाजशास्त्र या तीन विषयांतून एम.ए. पूर्ण केले आहे. तसेच एम. एड., एम. फिल. या पदव्युत्तर पदव्याही घेतल्या आहेत. तसेच पुणे येथून ‘हिंदी पंडित’ ही पदवीसुद्धा त्यांनी घेतली आहे. तरीही काझी यांना गेली वीस वर्षे महिन्याला फक्त दोन हजार ३९६ रुपये इतकाच पगार मिळतो. शाळा उघडण्यापासून ती झाडणे, विद्यार्थ्यांना शिकविण्यापासून त्यांची शैक्षणिक कागदपत्रे तयार करण्याचे काम ते एकटेच करीत आहेत.
काझी शाळेच्या अनुदानाच्या कामासाठी जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकेतील कोणत्याही कार्यालयात गेल्यानंतर त्यांची ‘नाईट स्कूल आले’ असे संबोधून टर उडविली जाते. मात्र, काझी यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, गरीब विद्यार्थ्यांना काम करता-करता शिकता यावे, याच मुख्य हेतूने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आपले काम सुरूच ठेवले आहे.
समाजातील वंचित व उपेक्षित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने ही रात्रशाळा सुरू आहे. या ठिकाणी मी एकटाच शिक्षक कार्यरत आहे. शासनाचे अनुदान मिळण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न करण्यासाठी अनेक वेळा प्रशासनाची दारे ठोठावली; मात्र कोणीच माझी दखल घेत नाही.
- एस. एच. काझी, प्रभारी मुख्याध्यापक
प्रदीप शिंदे- कोल्हापूर ( लोकमत )

मार्कशीट किंवा पदवी प्रमाणपत्र हरवल्यास त्याची डुप्लिकेट कॉपी कशी मिळवावी?

सध्या विविध कामांसाठी आपल्याला पदवी अभ्यासक्रमाची मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्र आवश्यक असते. कधी नोकरीसाठी तरी कधी अन्य कामांसाठी या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. पण अनेक वेळा जुनी मार्कशीट किंवा पदवी प्रमाणपत्र गहाळ झालेली असते. अशावेळी ही गहाळ मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्र नेमके कसे मिळू शकते, हा प्रश्न आपल्याला नेहमी सतावतो. नवीन मार्कशीट कशी मिळवायची किंवा पदवी प्रमाणपत्र कसे काढायचे, त्याबद्दल जाणून घेऊ या हेल्पलाइनद्वारे...
कशी मिळेल मार्कशीट...
मुळात एखाद्या विद्यार्थ्याची मार्कशीट हरविली अथवा गहाळ झाली असेल, तर त्यासाठी प्रथम त्या विद्यार्थ्याला नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणे गरजेचे आहे. त्यानंतर हरविलेली मार्कशीट नेमकी कशी हरविली किंवा नेमके काय झाले, यासंदर्भात विद्यार्थ्यांना ५० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तयार करणे गरजेचे आहे. त्यानंतर हे दोन्ही कागदपत्रे घेऊन संबंधितांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाशी संपर्क साधावा. याठिकाणी यासंदर्भात एक फॉर्म उपलब्ध असून, त्या फार्मसोबत एफआयआर आणि प्रतिज्ञापत्र ही कागदपत्रे सादर करावी. हा अर्ज सादर केल्यानंतर साधारणपणे १५ दिवसांच्या आत विद्यार्थ्यांना मार्कशीटची दुसरी प्रत उपलब्ध होते. ही दुसरी मार्कशीट देताना त्या विद्यार्थ्यांच्या निकालाची सर्व माहिती विद्यापीठाकडून पुन्हा एकदा तपासून मगच ती दिली जाते.
येणारा खर्च....
मुळात नवी मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्र
मिळण्यासाठी विद्यार्थ्यांकडून विद्यापीठ काही फी आकारते. संबंधितांची मार्कशीट किंवा पदवी प्रमाणपत्र जितके जुने असेल, तितकी फी आकारली जाते. यासाठी कोणतेही ठराविक शुल्क निश्चित करण्यात आलेले नसून, संबंधितांची मार्कशीट किंवा पदवी प्रमाणपत्र किती जुने आहे, यावर ते ठरविण्यात येते. कसे मिळेल नवे पदवी प्रमाणपत्र एखादा विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याची मार्कशीट आणि पदवी प्रमाणतपत्र वेळेनुसार विद्यापीठाकडून कॉलेजात पाठविण्यात येते. मात्र अनेक वेळा विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र मिळत नसल्याची तक्रारही पुढे येते. या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात संपर्क साधल्यास त्यांना नवे पदवी प्रमाणत्र मिळू शकते. त्यासाठी एक विशेष अर्ज विद्यापीठाकडून भरून घेतला जातो. या अर्जासाठी विद्यापीठाकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
कसे मिळेल पदवी प्रमाणपत्र...
मुळात हरविलेली किंवा गहाळ झालेली मार्कशीट किंवा पदवी प्रमाणपत्र मिळण्याची पद्धत जवळपास एकसमानच आहे. यासाठी विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्यातील एफआयआरची प्रत आणि प्रतिज्ञापत्रासह नव्या पदवी प्रमाणपत्रासाठीचा अर्ज भरावा लागतो. साधारणपणे २५ दिवसांत विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाते. पदवी प्रमाणपत्रांचे हे प्रमाणपत्र जेवढे जुने असेल तेवढे ते मिळण्यास उशीर लागतो. मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्रांचे डिमॅटिंग विद्यार्थ्यांची सोय आणि वाढते कम्प्युटरायझेशन लक्षात घेता मुंबई विद्यापीठाने नॅशनल अकॅडमिक डिपोझटरी योजना म्हणजे, मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्रांचे डिमॅटिंग सुरू करण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला आता गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र सुरक्षितरित्या ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करता येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून ही सेवा उपलब्ध केली जाणार आहे. सीडीएसएलच्या माध्यमातून शैक्षणिक कागदपत्रांचे जतन केले जात आहे. कागदपत्रे डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना विशिष्ट लिंक उपलब्ध होणार असून लॉगइन आयडी आणि पासवर्ड दिला जाणार आहे. लॉगइन आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना ती कागदपत्रे डाऊनलोड करता येणार आहे. विशेष म्हणजे गुणपत्रिकांवर डिजिटल स्वाक्षरी असणार आहे. जेणेकरून पडताळणी करणे सोपे जाईल.
कशी असणार डिमॅट पद्धत...
या माध्यमातून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर
झाल्यावर नॅशनल अकॅडमिक डिपोझिटरीमध्ये माहिती अपलोड केली जाणार आहे. त्यानंतर हा सर्व डेटा डिजिटल स्वाक्षरीद्वारे उपलब्ध करून दिला जाणार आहे. गुणपत्रिका डाऊनलोड करण्यासाठीच्या सर्व सूचना आणि त्याची एक लिंक विद्यापीठाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाणार असून, मार्कशीटवर परीक्षा नियंत्रकाची डिजिटल स्वाक्षरी असेल. तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी संबंधित संस्थेतर्फे ईमेल पाठवला जाईल.
Thank u- सौरभ शर्मा हेल्पलाइन

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...