बलात्कार... स्त्री अत्याचार थांबवण्याचे उपाय !!

आपल्या शाळांमध्ये, शिक्षण व्यवस्थेत आपण जी बैठक व्यवस्था करतो, त्यात मुले आणि मुली एकमेकांपासून वेगवेगळी बसवली जातात. मला वाटते, ही व्यवस्था बदलायला हवी. अगदी लहान वयाच्या मुलांपासून कोणत्याही वयाच्या मुलांपर्यंत सगळे शिक्षण पूर्ण होईपर्यंत मुलामुलींना एकत्र, एकमेकात मिसळून बसू दिले पाहिजे. लहान वयात मुलेमुली एकमेकात मिळूनमिसळून वागत वावरत असतात. पण ती वयात येऊ लागली की त्यांना एकमेकांपासून वेगळे केले जाते आणि मिसळू दिले जात नाही. याचा त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. एकमेकांबद्दल परकेपणा येतो, दुरावा येतो, दुसरी जमात आपल्यापेक्षा वेगळी आहे असे वाटू लागते, गूढ आकर्षण वाटू लागते किंवा तिरस्कारसुद्धा वाटू लागतो. हा दुरावा भविष्यात वेगवेगळी रूपे घेतो.
स्त्री-पुरुष एकमेकांनी एकमेकांना जिंकण्याच्या वस्तू होऊन जातात. माणूस म्हणून एकमेकांची किंमत संपते आणि एकमेकांकडे नर-मादी म्हणून पाहिले जाऊ लागते. पुरुष ही दहशतीची बाब होते तर स्त्री ही नजरेने ओरबाडण्याची, संधी मिळाली तर बलात्कार करण्याची बाब होते. एकमेकांबद्दल दोघांच्याही मेंदूत अनेक प्रकारच्या विकृती निर्माण होतात, त्यातून कधीच न मिटणारा स्त्री-पुरुष वर्चस्वाचा झगडा सुरू होतो, प्रथम-दुय्यम सुरू होते, एकमेकांवर अन्याय अत्याचर करण्याचे प्रकार वाढतात. एकमेकात जगण्याच्या प्रत्येक मुद्द्याबाबत स्पर्धा निर्माण होते. एकमेकांबद्दलचा निकोपपणा, निरोगीपणा, निर्मळपणा संपतो. स्त्री-पुरुषांच्या सर्व नात्यांमध्ये आज जे जे बिनसलेले दिसते ते ते सगळे सुरू होते. हे सर्व थांबवायचे किंवा किमान कमी करायचे तर, स्त्री-पुरुषांना अगदी लहान वयापासून पुढच्या सर्व वयांपर्यंत मोकळेपणाने सर्वच ठिकाणी एकमेकात मिळू-मिसळू दिले पाहिजे.
पण आज शाळा शिकण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यात मोठ्या संख्येने स्त्री-पुरुष सहभागी होतात, तर किमान त्या ठिकाणी तरी स्त्री-पुरुषांना म्हणजेच मुला-मुलींना एकत्र, मिसळून बसू, वावरू दिले पाहिजे. त्याचे सकारात्मक परिणाम बरेच मिळतील. त्यातले काही ठळक असे स्त्रियांचे दुय्यमपण संपेल. स्त्रियांवरचे बलात्कार कमी होतील. एकमेकांकडे वासनाळपणे पाहणे कमी होईल. स्त्रियांवरचे अन्याय कमी होतील. मुला-मुलींचे परीक्षांमधले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढेल. असे अनेक फायदे आहेत. शोधत जाऊ तेवढे सापडत जातील. सर्व देशात किमान शैक्षणिक ठिकाणी तरी या गोष्टीची अंमलबजावणी केली पाहिजे. त्याने स्त्री-पुरुषांचा समाज निश्चितच उन्नत होईल आणि देशही उन्नत होईल.
विचार- राजन खान

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...